Translate

Monday, 24 August 2020

यश तुझ्या कवेतच आहे !!! - Long

Image may contain: text 

आयुष्य तुझे आहे,

ते तुलाच जगायचं आहे;

असेल जरी काळोख चहूकडे,

ही उद्याच्या पहाटेची चाहूल आहे.


कुणाच्या तरी सोबतीची गरज भासते,

जेव्हा संकटांच्या भोवऱ्यात अडकतो;

साऱ्या विश्वाची साथ मिळते हो,

जो सुविचारांचा धागा पकडतो.


जगण्याच्या खुणांच्या शोधात,

अजूनही तुझा तोल जातो आहे;

यशापयशाच्या सुख-दु:खात,

स्वतःलाच वाहवत नेतो आहे.


माझ्यातला ‘मी’ पणा,

सर्वांमध्येच असतो;

तरीच, कुणी कुणाचा नाही येथे,

एकटेच येतो आणि एकटेच जातो.

 

तेव्हा.., यशस्वी जीवन जगण्याचा,

लढा तुलाच द्यायचा आहे;

लढताना मात्र तुला काही,

मर्यादाही सांभाळायच्या आहे.

 

लढण्यास का बरं डरतोस ?

हाती इतकी शस्त्रे असताना;

फक्त थोड्या हिंमतीची गरज असते,

योग्य शस्त्र चालवताना.


Image may contain: text 


एकाग्रता, सजगता, संयम आणि समता

हीच ती तुझी शस्त्रे आहेत;

पावलो-पावली वापरलेस,

तर मित्र सख्खे आहेत.

 

या शस्त्रांशी खेळ, कधी अजबच खेळतो,

मन घायाळ-घायाळ करून घेतो;

अन वार जेव्हा होतो नियतीचा,

तेव्हा बचाव फक्त ‘स्व’चा करतो?

 

कितीही बचाव केला ‘स्व’चा, तरीही,

नियतीचा पुन्हा पुन्हा वार होतो;

घायाळ असतांनाही आयुष्यात

वादळांशी लढा द्यावा लागतो....

 

अरेच्चा!!! तू लढा दिलासही....!

 

शाब्बास!!! तू लढा दिलास,

जिंकणं तुझ्या हाती आहे;

पाखरा, आकाशी झेप घेतली,

आता आकाश तुझे आहे.

 

अपयश, पळून जाईल तुझ्या मेहनती पुढे,

जरा वळून तर बघ......,

यश तुझ्या कवेतच आहे;

यश तुझ्या कवेतच आहे.

 

 - © हर्षिता

4 comments: